महाराष्ट्र

maharashtra

परभणीचा 12वीचा निकाल 84.66 टक्के; पुन्हा मुलींनीच बाजी मारली

By

Published : Jul 16, 2020, 3:28 PM IST

परभणी जिल्ह्याचा निकाल औरंगाबाद विभागात सर्वात कमी लागला आहे. जिल्ह्याचा बारावीचा निकाल केवळ 84.66 टक्के इतकाच लागला आहे.

parbhani
parbhani

परभणी - औरंगाबाद विभागीय बोर्डाअंतर्गत येणाऱ्या परभणी जिल्ह्याचा आज गुरुवारी बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात जिल्ह्याचा निकाल 84.66 टक्के एवढा आहे. जिल्ह्याचा हा निकाल मात्र विभागात सर्वात निचांकी असून, नेहमीप्रमाणे यावेळी देखील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. दरम्यान, बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल 92.20 टक्के तर कला 77.10 टक्के, वाणिज्य 91.51 टक्के आणि एमसीव्हीसी शाखेचा निकाल 76.45 टक्के लागला आहे

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (16 जुलै) दुपारी जाहीर झाला आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातील 84.66 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल औरंगाबाद विभागात सर्वात निचांकी राहिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी 13 हजार 823 मुले व 9 हजार 23 मुली असे एकूण 22 हजार 849 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 11 हजार 118 मुले तर 8 हजार 227 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे एकूण सर्व शाखेच्या निकालात यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारल्याचे समोर आले आहे. उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींचे प्रमाण 91.15 तर मुलांचे 80.49 टक्के आहे. तसेच जिल्ह्याच्या एकूण निकालात परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्याने बाजी मारली आहे. तर सर्वात कमी निकाल पूर्णा तालुक्याचा राहिला आहे. सेलू तालुक्याचा निकाल 89.79 टक्के तर गंगाखेड 87.65, परभणी 85.39, पाथरी 85.15, पालम 84.68, जिंतूर 84, मानवत 80.65, सोनपेठ 79 व पूर्णा तालुक्याचा 78.36 टक्के निकाल जाहीर झाला आहे.

दरम्यान, विज्ञान शाखेत प्रविष्ट झालेल्या 9 हजार 55 पैकी 8 हजार 349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गुणवत्ता यादीत 460 विद्यार्थी आले आहेत. कला शाखेच्या 10 हजार 696 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 8 हजार 245 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 639 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. तसेच वाणिज्य शाखेतील 2 हजार 531 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 316 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 497 विद्यार्थी गुणवत्तेत आले आहेत. या प्रमाणेच एमसीव्हीसी शाखेतून परीक्षा देणाऱ्या 569 विद्यार्थ्यांपैकी 435 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 8 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत यश मिळविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details