परभणी - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालक पदांसाठी काल (रविवार) परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. मतमोजणी उद्या (मंगळवार) परभणी शहरातील जायकवाडी वसाहत परिसरातील कल्याण मंडपम् येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सोमवार (आज) कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. कल्याण मंडपम् येथे मंगळवार सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच आत्तापर्यत ५४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे. अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उमेदवारांनाही चाचणी करण्याचे आवाहन
मतमोजणीला उपस्थित राहणार्या अधिकारी-कर्मचार्यांसह उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आदीनी आरटीपीसीआर किंवा एंटीजेन चाचणी करून घ्यावे. असे आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.
१४ जागांसाठी होणार मतमोजणी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित १४ जागांसाठी मतदान झाले आहे. या मतदानाची मतमोजणी उद्या (मंगळवार) होणार आहे. मतदानानंतर सीलबंद मतपेट्या कल्याण मंडपम् च्या स्ट्राँगरुममध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मंगळवारी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आठ मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलावर प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदारसंघाची तालुका निहाय मतमोजणी करण्यात येणार आहे.