परभणी - गेल्या वर्षीपरभणी जिल्ह्याला 9 हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्यांची पूर्तता होऊन देखील, मोठ्या प्रमाणात बियाणे कमी पडले. त्यामुळे आम्ही यंदा शासनाकडे 'महाबीज'च्या माध्यमातून 15 हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी नोंदवली असल्याची माहिती आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली. या संदर्भात आमदार पाटील यांनी 'महाबीज'च्या विभागीय आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, बियाण्यासंदर्भातील आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
परभणी जिल्ह्यात गतवर्षी सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण न झाल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यावेळी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, या वर्षी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी यासंदर्भात पूर्वतयारी केल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी येथील महाबीजच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन त्या ठिकाणच्या विभागीय आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी बियाण्यांच्या पुरवठा संदर्भातील आढावा घेतला.
यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, 'या वर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. तर कपाशीचा पेरा जास्त होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व भार सोयाबीन वर येणार असल्याची परिस्थिती आहे. परिणामी, सोयाबीनची मागणी वाढणार आहे. 612 असेल किंवा 71 असेल, हे बियाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे. या पार्श्वभूमीवर महाबीजचे अध्यक्ष असतील, विभागीय अधिकारी असतील किंवा जिल्हास्तरीय अधिकारी असतील, यांच्याशी चर्चा केल्यानंतर भविष्यात सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे समजले. त्यामुळे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे 15 हजार क्विंटल बियाण्याची मागणी आम्ही 'महाबीज'कडे केली आहे.
जिल्ह्यासाठी 15 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांनी पुढील नियोजन करावे
तसेच शेतकऱ्यांनी देखील आताच पुढील नियोजन करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आतापासूनच बियाण्यांची नोंदणी केल्यास प्रशासनावर देखील एकदम बोजा पडणार नाही, व शेतकऱ्यांना देखील वेळेत बियाणे मिळेल असं देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
हेही वाचा -दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांना जामीन