महाराष्ट्र

maharashtra

धक्कादायक! परभणीत मंगळवारी आढळले आजपर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित; संख्या 67 वर..

By

Published : May 27, 2020, 7:38 AM IST

एका दिवसात 31 कोरोनाबाधित आढळले हा परभणीतील रुग्ण संख्येत वाढ होण्याचा आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. 31 रुग्ण नेमके कोणाच्या संपर्कात आले आहेत, याची माहिती प्रशासन देणार आहे.

Parbhani corona update
परभणी कोरोना अपडेट

परभणी- 'लॉकडाऊन'च्या सुरुवातीचे दोन महिने ग्रीनझोन मध्ये असणाऱ्या परभणी जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील आठवड्यापासून दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या आता तब्बल 67 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मंगळवारी आढळले असून, त्यांची संख्या 31 एवढी आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, एक जण ठणठणीत बरा होऊन घरी परतला आहे. त्यानंतर सोमवारी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने परभणीकरांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, मंगळवारी दुसऱ्याच दिवशी परभणीकरांची चिंता वाढवणारी बातमी येऊन धडकली. एका दिवसात 31 कोरोनाबाधित आढळले असून हा आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे, त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

मंगळवारी रात्री 9 वाजता नांदेड येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 31 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यात परभणी शहर आणि तालुक्यातील 12 तर पूर्णेतील 10, सेलूतील 2, गंगाखेडमधील 4, पालम 1 आणि जिंतूरचे 2 असे एकूण 31 रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. हे रुग्ण नेमके कोणाच्या संपर्कात आले, कोठून आले आणि कधीपासून आलेले आहेत, याचे विश्लेषण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देखील डॉ. नागरगोजे यांनी दिली आहे.

परभणीत सर्वाधिक 12 रुग्ण आढळले असून हे रुग्ण कदाचित नानलपेठ पोलीस ठाण्यात आढळलेल्या कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील किंवा तालुक्यातील माळसोन्ना येथील रुग्णाच्या संपर्कातील असावेत, असा अंदाज बांधण्यात येतोय. तर याप्रमाणेच पूर्णा तालुक्यात यापूर्वी नागठाणा येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील दहा जण पॉझिटिव्ह असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे; परंतु याबाबतचे संपूर्ण विश्लेषण झाल्यानंतरच जिल्हा प्रशासनाकडून माहिती मिळणार आहे. त्यानंतरच मंगळवारी आढळून आलेले एकूण 31 रुग्ण नेमके कुठले आणि कोणाच्या संपर्कात आले आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 265 संशयितांचे स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबित असून, त्यापैकी 34 अनिर्णायक आहेत. उर्वरित रुग्णांचा अहवाल काय येतो ? याकडे आता परभणी जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details