परभणी -जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी राज्यभराप्रमाणे परभणीतही काँग्रेसकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या ढेपाळल्याचे पाहायला मिळाले. परभणीचे पालक असलेले माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.पी. सावंत यांनी मात्र काँग्रेसला उमेदवार मिळेल आणि जिंकूनही येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
परभणीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.पी. सावंत, बी.आर.कदम, भीमराव गायकवाड आदींसह जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन येथे मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. परभणी विधानसभेसाठी तब्बल 16 उमेदवार इच्छुक आहेत. पाथरीसाठी मात्र एकमेव जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी मुलाखत दिली. तर जिंतूर आणि गंगाखेड विधानसभेतून एकही इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी आला नाही.
काँग्रेसच्या जुना गड राहिलेल्या परभणी जिल्ह्यात सध्य परिस्थितीत काँग्रेसचा एकही आमदार नाही. काँग्रेसची जागा आता राष्ट्रवादीने घेतली आहे. खासदार-आमदार सेनेचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असे समीकरण गेल्या काही वर्षात जिल्ह्यात दिसून येते. त्यात काँग्रेसला फारसे स्थान राहिलेले नाही. असे असले तरी काँग्रेसचे जुने जाणते पुढारी मात्र अजूनही काँग्रेससाठी तळमळ करत असतात.