परभणी -कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. रविवारी या कोविड सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते झाले. भविष्यात जर संसर्ग वाढला तर नवीन तीनशे बेडच्या कोविड सेंटरचे नियोजन करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले.
प्रत्येक बेडवर ऑक्सिजनची सुविधा
सदर 50 बेडच्या रुग्णालयात एकूण 66 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 10 'एमबीबीएस' डॉक्टर, 6 बालरोग तज्ज्ञ आणि 50 परिचारिकांचा समावेश आहे. या ठिकाणी 10 व्हेंटिलेटर बेडची सुविधा करण्यात आली असून, संपूर्ण 50 बेडवर ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे.
आणखी 300 बेडच्या स्वतंत्र रुग्णालयाचे नियोजन - मुगळीकर
दरम्यान, तिसर्या लाटेत लहान मुलांमधील संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर हे 50 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी भविष्यात जर बाल रुग्णांची संख्या वाढली तर त्यासाठी परभणी जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत 300 खाटांचे स्वतंत्र कोरोना बाल रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. गरज पडल्यास ते देखील कार्यान्वित होईल, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली.