परभणी- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील शाळा आणि आठवडी बाजार पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव : परभणीत शाळा, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
शहरात तसेच ग्रामीण भागात आठवड्याच्या विशिष्ट वारी भरणाऱ्या बाजारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, या ठिकाणी कोरोना संदर्भातील कुठल्याही नियमांचे पालन होत नाही. नागरिक सामाजिक अंतराचे पालन करत नसून, सॅनिटाझरचा वापर होताना दिसत नाही. शिवाय तोंडाला मास्क न लावता नागरिक फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रुग्ण संख्येत वाढ -
गेल्या दोन ते तीन महिन्यात परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. दररोज सरासरी आठ ते दहा रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच परभणी जिल्ह्यात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, गेल्या 3 दिवसात ही संख्या वाढली आहे. १७ फेब्रुवारीला २७, १८ फेब्रुवारीला २४ तर काल २० फेब्रुवारीला १३ रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा संसर्ग पुन्हा एकदा रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत.
२८ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर निर्बंध आणण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या पाचवी ते नववीपर्यंत व ११वी च्या शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित शाळेत अध्यापनाचे कार्य व आवश्यक ती कामे करावी लागणार आहेत. असे असले तरी दहावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात बजावले आहे.
१५ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
शहरात तसेच ग्रामीण भागात आठवड्याच्या विशिष्ट वारी भरणाऱ्या बाजारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, या ठिकाणी कोरोना संदर्भातील कुठल्याही नियमांचे पालन होत नाही. नागरिक सामाजिक अंतराचे पालन करत नसून, सॅनिटाझरचा वापर होताना दिसत नाही. शिवाय तोंडाला मास्क न लावता नागरिक फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्गात होणारी वाढ लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील, असे आदेश बजावण्यात आले आहेत. यासंदर्भात अंमलबजावणीची जबाबदारी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.