परभणी - कोरोनाच्या अत्यंत बिकट प्रसंगात देखील परभणीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांचे विलगीकरण कक्ष आणि कोरोनाबाधित रुग्णाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. विलगीकरण कक्षामधील स्वच्छता, प्रसाधनगृह स्वच्छतेकडे दुर्लक्ष तसेच रुग्णांसाठी भोजन व राहण्यासाठी कोणतीही सुविधा केलेली नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय देखील सील करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कर्तव्य न करता केवळ शासकीय निधीकडे लक्ष देणाऱ्या शल्यचिकित्सक नागरगोजे यांना त्वरित पदमुक्त करावे, अशी मागणी परभणीतील भाजप पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारवजा निवेदन दिले आहे. तसेच यासंदर्भात परभणीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी देखील दूरध्वनीवर संपर्क करून जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कामकाजाविषयी तक्रार केली आहे. यावेळी भाजप मनपा गटनेत्या मंगल मुदगलकर, मनपा सदस्य मोकिंद खिल्लारे, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे, संजय शेळके, मोहन कुलकर्णी, प्रशांत सांगळे, विजय दराडे, प्रविण देशमुख उपस्थित होते.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागरगोजे यांनी कोरोनाच्या अत्यंत बिकट प्रसंगी विलगीकरण कक्ष आणि कोरोनाबाधित रुग्णाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. विलगीकरण कक्ष, प्रसाधनगृहाची स्वच्छता याकडे दुर्लक्ष करून रुग्णांसाठी भोजन व राहण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. केंद्र शासन व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून सर्व अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. तरीही डॉ. नागरगोजे रुग्णाकडे लक्ष देत नसून त्यांची नजर फक्त शासनाने दिलेल्या निधीकडे आहे, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच ते इतर सुविधांकडे व तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करतात. फक्त शासकीय निधीची विल्हेवाट कशी लावायची याकडेच त्यांचे लक्ष आहे असेही म्हटले गेले आहे. तरी, शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यातून सोयीसुविधा निर्माण न करता सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि भोंगळ कारभार दिसून येत आहे.