परभणी -राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आरोग्य, पशुसंवर्धन आणि जिल्हा प्रशासनाने वेळेत उपाययोजना करून हा संसर्ग आटोक्यात आणला आहे. दरम्यान, भारतात हा संसर्ग अजून मानवापर्यंत पोहोचलेला नाही. परंतु तो मानवापर्यंत पोहोचल्यास ५० टक्क्यांपर्यंत मृत्यूदर होऊ शकतो. त्यामुळे ज्या भागात 'बर्ड फ्लू'चा संसर्ग आढळून आला, तो परिसर ९० दिवसांपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावा अशी सूचना मंगळवारी परभणीत आलेल्या केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हा प्रशासनाला केली आहे. तर केंद्रीय आरोग्य पथकाच्या सूचनेनुसार काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
'बर्डफ्लू'च्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात दिल्ली येथील केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी आले आहे. या पथकाने बर्ड फ्लू बाधित कोंबड्यांचा परिसर असलेल्या मुरुंबा, कुपटा आणि पेडगाव या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर संबंधित यंत्रणेची बैठक घेत त्यांना काही सूचना केल्या आहेत. या सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या संदर्भाततील माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, केंद्रीय आरोग्य पथकातील सदस्य तथा सार्वजनिक आरोग्य सेवा सल्लागार समितीचे डॉ.सुनील खापरडे, औषधशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. रोहितकुमार, विषाणू शास्त्रज्ञ डॉ.मनोहर चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अशोक लोणे यांची उपस्थिती होती.
बर्ड फ्लूच्या अनुषंगाने केलेल्या सर्व तपासण्या निगेटिव्ह
सदर पथकाने परभणीतील बर्ड फ्लू ग्रस्त मुरुंबा, कुपटा आणि पेडगाव या परिसराला भेट देऊन परभणी जिल्हा प्रशासनाने केलेल्या कलिंग प्रक्रियेची पाहणी केली. तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच बर्ड फ्लू ग्रस्त कोंबड्या नष्ट करून तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासण्या तात्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या देखील तपासण्या करण्यात आल्या. त्याप्रमाणेच परभणी जिल्ह्यातील मटण, चिकन आणि अंडी व्यवसायिक तसेच पोल्ट्रीफार्म संबंधित काम करणाऱ्या लोकांच्या देखील बर्डफ्लूच्या अनुषंगाने तपासण्या तात्काळ करून घेण्यात आल्या. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यावेळी दिली.
एकूण 4 हजार 55 पक्षी नष्ट करण्यात आले