परभणी- परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी, असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.
शिवसेनेचे राहुल पाटील हे परभणीचे आमदार आहेत. पाथरी मतदार संघातून अपक्ष आमदार मोहन फड यांना भरघोस मते देऊन विधानसभेत पाठवलं होत. त्यानंतर आमदार मोहन फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्याशी वितुष्ट त्यांनी आल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानपरिषदेवर बाबाजानी दुऱ्हानी हे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. तर विपलव बाजोरीया हे आमदार आहेत. तर संजय जाधव हे शिवसेनचे खासदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडीचं प्राबल्य आहे.
जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. तर महानगर पालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पाथरी, जिंतूर, पालम नगरपालिका राष्ट्रवादीच्या तर गंगाखेड काँग्रेसच्या ताब्यात आहे. सेलू, मानवत आणि सोनपेठ या नगरपालिका भाजपच्या, तर पूर्णा, मानवत ह्या दोन नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. 9 पैकी 5 पंचायत समित्या आघाडीच्या ताब्यात आहेत तर 4 युतीच्या ताब्यात आहेत.
परभणी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
याठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांची काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांच्याशी प्रमुख लढत होत आहे. तसेच प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसचे रविराज देशमुख आणि एमआयएमचे अली खान यांच्याकडे ही पाहिल्या जाते. याशिवाय याठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोहम्मद झैन हे देखील रिंगणात आहेत.
मागच्या वेळी (2014) परभणी विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी एमआयएमचे सज्जू लाला यांच्यावर 27000 मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे आनंद भरोसे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी 40 हजारांहून अधिक मते मिळवली होती. मात्र यावेळी युती असल्याने भाजपच्या आनंद भरोसे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या सोबत आहेत.
परभणी विधानसभा मतदारसंघ निकाल 2014
- डॉ. राहुल पाटील (शिवसेना) - 71 हजार 584
- खालीद सय्यद (एमआयएम) 45 हजार 058
- आनंदराव भरोसे (भाजप) - 42 हजार 051
- प्रताप देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस) - 11 हजार 375
पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढत
पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार मोहन फड यांचा सामना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्याशी होत आहे.
मागच्यावेळी (2014) देखील या दोघांमध्येच काट्याची टक्कर होऊन अवघ्या दोन हजारांच्या फरकाने मोहन फड यांनी विजय मिळवला होता. यावेळी मात्र या दोघातच पुन्हा सामना रंगत आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे विलास बाबर आणि शिवसेनेचे बंडखोर डॉ. जगदीश शिंदे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांचा प्रभाव मोहन फड आणि सुरेश वरपूडकर या दोघांवरही पडणार असून नेमका त्याचा फटका कोणाला बसतो हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे या ठिकाणी यावेळी देखील काट्याची टक्कर असल्याचे दिसून येते.