महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 6, 2019, 8:24 PM IST

ETV Bharat / state

लातुरच्या सेवालयातील HIV बाधीत जोडप्याचा विवाह; परभणीची संस्था करणार कन्यादान

एचएआरसी ट्रस्टतर्फे या वैवाहिक जोडप्यांना डबल बेड पलंग, स्टील कपाट, किराणा सामान, नवरदेव व नवरीसाठी पोशाख, दागिने आणि सेवालययातील इतर मुलांसाठी कपडे पाठविली जाणार आहेत.

सेवाभावी संस्थेचे पवन चांडक

परभणी - विवाह हा अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचा टप्पा असतो. असाच अनुभव लातूर येथील सेवालयातील एचआयव्ही बाधीत अनाथ तरुण-तरुणी घेणार आहेत. विशेष म्हणजे या एचआयव्हीबाधीत अनाथ मुलांच्या विवाहाचे पालकत्व परभणीच्या एचएआरसी ट्रस्टने स्वीकारले आहे. या मुलांचे विवाह उद्या सायंकाळी ६ वाजता होणार आहेत.

एचएआरसी ट्रस्टतर्फे या वैवाहिक जोडप्यांना डबल बेड पलंग, स्टील कपाट, किराणा सामान, नवरदेव व नवरीसाठी पोशाख, दागिने आणि सेवालययातील इतर मुलांसाठी कपडे पाठविली जाणार आहेत. सामाजिक दायित्व निभावण्यासाठी एचएआरसी ट्रस्टतर्फे हा प्रयत्न करण्यात येणार आहे.

हासेगावात केला जात आहे एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ-
लातूर जिल्ह्यातील हासेगावात रवी बापटले यांच्या देखरेखीखाली सेवालयात ६६ एचआयव्ही बाधीत अनाथ मुलांचा सांभाळ केला जात आहे. याच मुलांचे २०१४ पासून परभणीच्या होमिओपॅथिक अॅकडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने स्वेच्छेने पालकत्व स्वीकारले आहे. या मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन आदी विषयावर वेळोवेळी लोकसहभागातून मदत केली जाते. इतकेच नाही तर सेवालयाने नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे, मुलांनी तयार केलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती, सॅनिटरी नॅपकिन, कापडी पिशव्यांच्या विक्रीसाठी मदत केली जाते. आता हाच उद्योग सांभाळणारे मुले विवाह योग्य झाली आहेत.

जोडप्यांना भेटवस्तू देऊन अनेकजण देणार आशिर्वाद-

'नोव्हारीपाईन' हे औषध एचआयव्ही संक्रमित मातेस गरोदरपणात दिले तर होणाऱ्या बाळाला एचआयव्हीची लागण होत नाही. हे वेळोवेळी झालेल्या संशोधन आणि यापूर्वी झालेल्या विवाहातून सिद्ध झाले आहे. त्यानुसार औषधोपचार झालेल्या अशाच काही मुलांचा विवाह उद्या सायंकाळी ६ वाजता होत आहे. यापैकी २ जोडप्यांचे कन्यादान तसेच पालकत्व परभणीच्या एचएआरसी संस्थेने स्वीकारले आहे. या ठिकाणच्या समविचारी मित्रांनी एकत्र येऊन या जोडप्यांना भावी आयुष्यात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच आहेर देऊन आशीर्वाद दिले आहेत.

परभणीची संस्था करणार एचआयव्ही बाधीत मुलींचे कन्यादान

विवाह सोहळ्याला मान्यवर राहणार उपस्थित-

विवाह सोहळ्याला लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, राजकुमार धुरगुडे, अभिमन्यू पवार, प्रा. सोनवणे, प्रा. महारुद्र मंगनाळे आदी उपस्थित राहणार आहेत. एचएआरसी संस्थेतर्फे बसंती चांडक, सत्यनारायण चांडक, वर्षा कालानी आणि महेश कालानी हे कन्यादान करणार आहेत. तर परभणी व लातूर येथील समविचारी मित्रांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. शिवा आयथॉल, अमील कंठवार व कालानी यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details