परभणी- भाजप सरकारने मराठवाड्याच्या सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांची मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली होती. मात्र, या सरकारने राजकीय द्वेषापोटी ही योजनाच रद्द केली. ज्या मराठवाड्याने शिवसेनेला भरभरून दिले, त्याच मराठवाड्याच्या योजनेचे त्यांनी काय केले, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (दि. 4 ऑक्टो) परभणीत उपस्थित केला. तसेच दुसरी अतिवृष्टी आली तरी या सरकारची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जिल्हा दौर्यावर आले आहेत. रविवारी संध्याकाळी 7 वाजता त्यांनी सावली विश्रामगृहावर यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली.
ते म्हणाले, परभणीसह आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांची मोठी हानी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यात तब्बल 268 मिलिमीटर पाऊस पडल्याने शेती बाधित झाली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे आवश्यक आहे. मात्र, 40 टक्केही पिककर्ज वाटप झाले नाही. पीक विमा देखील भेटला नाही. शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळत नाही. चार महिने झाले, शेतकऱ्यांना दमडी देखील या सरकारने दिलेली नाही, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.
तसेच पाहणी दरम्यान सर्वत्र विदारक चित्र दिसले असून, सरकारने सरसकट पंचनामे करून बागायतदारांना 50 हजार तर कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार रुपये एकरी मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे विमा कंपनीने नुकसान भरपाईसाठी महसूलने केलेले पंचनामे गृहीत धरावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.