पुणे Opposition Aggressive Against Drugs:पुणे पोलिसांच्या वाहनाचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पुणे पोलिसांची गाडी कैद्यांना घेऊन जात असताना एका ठिकाणी थांबते आणि तिथं काही पॅकेट त्या गाडीत पोलिसांकडून टाकण्यात आल्याचं व्हिडिओत दिसतंय. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत 'ही कसली पाकीटं पुरवली जात आहेत?' असं म्हणत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारलाय.
सुषमा अंधारेंचं ट्विट काय : सुषमा अंधारे यांनी व्हायरल व्हिडिओ ट्विट करत, 'उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीटं पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड' असं म्हणत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय.
ललित पाटील प्रकरणावरून आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक : एकीकडं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरुन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाच्या बाबतीत शासनाकडून चौकशी समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर करून पंधरा दिवस होऊनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचं म्हणत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे आक्रमक झाले आहेत. जर याबाबत कोणतीही कारवाई नाही झाली, तर पोलीस आयुक्त यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असून वेळप्रसंगी न्यायालयात देखील जाणार असल्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकरांनी दिलाय.
ससूनच्या अधिष्ठांतांना अटक करावी :ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि ललित पाटील यांनी मिळून ड्रग्ज विकलंय. हे मी सातत्यानं बोलत आहे. तसंच ससूनच्या कॅन्टीन मधून हे सगळं व्यवहार सुरू होतं. याबाबत पोलिसांना माहिती असूनही कोणतीही कारवाई होत नाही. याबाबत पोलिसांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना अटक करावी अशी मागणी यावेळी धंगेकर यांनी केलीय.
हेही वाचा :
- Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त; पुणे पोलिसांची नाशकात कारवाई
- Drugs Factory burst : छत्रपती संभाजीनगर बनतंय 'ड्रग्ज कॅपीटल?' कारखान्यातून 160 कोटींचे अमली पदार्थ डीआरआयकडून जप्त
- Solapur drugs factory case : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई; सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी हैदराबादमधून एकाला अटक