परभणी- संपूर्ण देशात किमती वाढल्याने कांदा हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे आता हा कांदा गोरगरिबांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पावले उचलली असून यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुका तहसीलदारांकडून काद्याची मागणी नोंदवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच कांदा रेशन दुकानामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसाने राज्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी उत्पादन घटल्याने कांद्याचे दर गगनाला भिडले. कांद्याचा भाव शंभर ते दीडशे रुपयांवर जाऊन पोहोचला. परभणी शहरात तसेच जिल्ह्यात हाच कांदा किरकोळ बाजारात शंभर रुपये किलो दराने मिळत आहे. हीच परिस्थिती संपूर्ण राज्यात असून यामुळे सरकारवर देखील मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता हा कांदा गरिबांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पावले उचलली आहेत. रेशन दुकानमध्ये 50 ते 55 रुपये या किमतीने हा कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.