परभणी- गंगाखेड रोडवर पिंगळगड नाल्याजवळ टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन यात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ग्रामसेवकासोबत असलेला एक व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परभणीत टिप्पर-दुचाकीच्या धडकेत ग्रामसेवक ठार, एक जखमी - Giriraj Bhagat
गंगाखेड रोडवरील पिंगळगड नाल्याजवळ टिप्पर आणि दुचाकीची धडक होऊन यात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलीपराव सोनराव देशमुख (वय ५४ वर्ष), असे अपघातात मृत झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते परभणी पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सोमवारी दुपारी ते गंगाखेड रोडवरून परभणीकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. यात चाकाखाली आलेल्या देशमुख यांच्या जागेवरच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. तर सोबतचा व्यक्ती जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातामुळे परभणी-गंगाखेड रस्त्यावरील वाहतूक बराच काळ खोळंबली होती. तर टिप्पर चालक घटनास्थळापासून फरार झाला असून, कोतवाली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.