परभणी - सद्यस्थितीला काही संशयितांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी त्यापैकी एकही रुग्ण कोरोनाग्रस्त नाही, त्यामुळे परभणीकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, कोरोना या संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, त्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा द्यावी, असे आदेश आपण प्रशासनाला दिले असून या दृष्टिकोनातून प्रशासनही पाऊले उचलत असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सायंकाळी सावली विश्रामगृह येथे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संबंधित अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. तसेच या दरम्यान त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विलगीकरण कक्षाच्या व्यवस्थेची देखील पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बालासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, महानगरपालिका आरोग्य विभागप्रमुख डॉ. कल्पना सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, तहसिलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.