महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत मोहन फड 'रिपाइं'चे तर मेघना बोर्डीकर 'रासप'च्या उमेदवार; कमळ फुलणार नाही - परभणी निवडणूक बातमी

परभणी जिल्ह्यात यावेळी भाजपच्या चिन्हावर एकही उमेदवार निवडणूक लढणार नाही. युतीच्या जागा वाटपामध्ये आलेल्या या दोन्ही जागा रासप आणि रिपाइं या मित्र पक्षांना दिल्या आहेत.

मोहन फड आणि मेघना बोर्डीकर

By

Published : Oct 3, 2019, 8:24 AM IST

परभणी -युतीच्या वाटाघाटीत एरवी परभणी जिल्ह्यातील एक जागा लढवणाऱ्या भाजपने यावेळी कमळाच्या चिन्हावर एकही उमेदवार उभा केलेला नाही. जिल्ह्यातील चार विधानसभांपैकी 2 ठिकाणी शिवसेना तर रिपाइं (ए) आणि रासपला मिळणाऱ्या चिन्हावर भाजपने आपले दोन उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे यावेळी सुद्धा परभणी जिल्ह्यात कमळ फुलणार नसल्याचे दिसून येते.

हेही वाचा - 'वंचित' कडून परभणी जिल्ह्यातील चारही उमेदवार जाहीर; नवख्यांना संधी देऊन दिला धक्का

पाथरी विधानसभेतील भाजपचे सहयोगी आमदार मोहन फड यांना रिपाइं (आठवले गट) ची उमेदवारी देण्यात आली आहे, तर जिंतूरमधून भाजपच्या युवा नेत्या मेघना बोर्डीकर या रासपच्या कोट्यातून निवडणूक लढवणार आहेत. या दोन्ही पक्षांनी अधिकृतरित्या मोहन फड व मेघना बोर्डीकर यांना आपले उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. यात परभणी व गंगाखेड हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे देण्यात आले आहेत. परभणीतून विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील तर गंगाखेडमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित पाथरी व जिंतूर हे दोन मतदारसंघ महायुतीत भाजपला मिळाले होते. मात्र, या दोन्ही जागा भाजपने मित्रपक्ष असलेल्या रिपाइं व रासपला सोडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपच्या चिन्हावर एकही जागा लढवली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - परभणीचे सेना आमदार राहुल पाटील यांना पुन्हा उमेदवारी; घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर मिळाला एबी फॉर्म

पाथरीत अपक्ष आमदार मोहन फड हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना सहज भाजपचे तिकीट मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, तसे झाले नाही. आता मोहन फड यांना रिपाइंच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या मेघना बोर्डीकर यांनाही रासपच्या तिकीटावर जिंतुरात निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात 2 शिवसेना तर एक रिपाइं व एक रासप जागा लढवेल, हे स्पष्ट झाले आहे.

"फड, बोर्डीकर यांच्यापुढे अडचणी"

पाथरी व जिंतूर मतदारसंघाच्या जागा या मित्र पक्षाला गेल्यानंतर पाथरीचे आमदार मोहन फड व जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुरुवातीपासून दोघांनीही भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रचार केला. विशेष म्हणजे दोघांच्याही मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जनादेश यात्रेच्या जोरदार सभाही घेतल्या. मात्र, आता दोघांनाही वेगळ्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार लागणार असल्याने त्याचा परिणाम कसा होईल, याची चिंता या दोन्ही उमेदवारांना भेडसावत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details