महाराष्ट्र

maharashtra

नियमात बसूनही परभणीच्या अनलॉकबाबत संभ्रम, सोमवारपासून सर्व सुरू होणार?

By

Published : Jun 5, 2021, 8:38 PM IST

राज्यात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाने अनलॉकबाबत दिलेल्या निर्देशानुसार परभणी पहिल्या टप्प्यात येते. तरीही परभणीच्या अनलॉकबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. अद्यापही परभणीच्या अनलॉकबाबत निर्णय झालेला नाही.

परभणी
परभणी

परभणी - राज्य शासनाकडून अनलॉक जाहीर झाले असले तरी परभणीत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे. राज्य शासनाने अनलॉकबाबत दिलेल्या निर्देशानुसार परभणी पहिल्या टप्प्यात येते. मात्र, परभणीच्या जिल्हा प्रशासनाने शनिवारी (5 जून) संध्याकाळी उशिरापर्यंत अनलॉकबाबतचे कुठलेही आदेश पारित केलेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्ग देखील परभणीच्या अनलॉकबाबत गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.

नियमात बसूनही परभणीच्या अनलॉकबाबत संभ्रम

परभणी जिल्हा हा शासनाच्या निर्देशानुसार अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात येतो. परभणीत आतापर्यंत सुमारे 50 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यातील 1 हजार 247 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीत मात्र दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या 50 च्या आत आहे. त्यामुळे परभणीचा समावेश पहिल्या टप्प्यात झाल्याचे दिसून येत आहे.

1308 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

परभणी जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीला 1308 रुग्णांवर जिल्हा रुग्णालय आणि इतर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान आज परभणी जिल्‍ह्यात 37 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

परभणीची एकूण रुग्णसंख्या 50 हजारांहून अधिक

परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या पहिला लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तब्बल 6 पट अधिक रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात डिसेंबर 2020 पर्यंत 7 हजार 500 कोरोना बाधित आढळून आले होते. तर सुमारे सव्वातीनशे बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र, जानेवारी 2021 पासून ते जून महिन्याच्या 5 तारखेपर्यंत हा आकडा वाढून तब्बल 50 हजार 151 एवढा झाला आहे. तर मृत्यूची संख्याही चारपट होऊन ती 1 हजार 247 एवढी झाली आहे. दुसरी लाट भयंकर असून यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले, तर मृत्यू दर देखील लक्षणीय आहे.

पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्‍क्‍यांच्या आत

परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. जिल्ह्यात साधारणपणे 1000हून अधिक संशयितांच्या कोरोना तपासण्या केल्या. त्या तुलनेत 50 हून कमी रुग्ण दररोज आढळून येत आहेत. त्यामुळे परभणीचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्‍क्‍यांच्या खाली गेल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत परभणी जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 474 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 2 लाख 99 हजार 118 रुग्ण निगेटिव्ह आढळून आले. तर 50 हजाराहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

सोमवारपासून अनलॉक?

शासनाच्या निर्देशानुसार, सध्यातरी परभणीचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. मात्र, आठवड्याचा अहवाल पाहून त्या जिल्ह्याचा समावेश कोणत्या टप्प्यात करायचा याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आज (5 जून) संध्याकाळपर्यंत आलेल्या अहवालाची सरासरी काढून परभणीचा समावेश कुठल्या टप्प्यात होईल, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी परभणी पहिल्या टप्प्यात असल्याचे दिसत आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील एसटी महामंडळ आणि खाजगी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय सलून, स्विमिंग पूल, मॉल आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळता असलेली दुकाने आणि आस्थापनेही सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार परभणीत शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन आहे. त्यानुसार आज शनिवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

अनलॉकसाठी असे आहे प्रमाण

दरम्यान, राज्यातल्या ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जेथे 25 टक्के किंवा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत, अशा जिल्ह्यांना पूर्ण अनलॉक केले जाणार आहे.

हेही वाचा -मराठा आरक्षण प्रश्नाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा, आमदार मेटेंचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details