महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत मंगळवारी आणखी 3 कोरोनाबाधित आढळले; रुग्णांची संख्या 115वर - परभणी कोरोना अपडेट्स

परभणीत आज सकाळी कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 115 वर पोहोचली आहे. यातील 91 जण कोरोनामुक्त झाले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 21 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

परभणीत आज आणखी 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
परभणीत आज आणखी 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Jun 30, 2020, 4:12 PM IST

परभणी - शहरात आज(मंगळवार) देखील 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे तीनही रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील असून, आता त्यांच्या संपर्कातील लोकांना आरोग्य प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, या 3 रुग्णांसह परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 115 एवढी झाली आहे. त्यातील 91 रुग्णांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली असून, 4 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, जिल्हा रुग्णालयात 20 रुग्णांवर सध्याच्या परिस्थितीत उपचार सुरू आहेत.

सुरुवातीचा दीड महिना ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या परभणीत मे महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काही काळ कोरोनाबधितांची संख्या रोडावली. मात्र रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताच पुन्हा परभणीतील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यानुसार कालपर्यंत परभणी जिल्ह्यात 112 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये आज पुन्हा 3 जणांची भर पडली. यामध्ये परभणी शहरातीलच 3 रुग्णांचा समावेश आहे. ज्यामध्ये काद्राबाद प्लॉट येथील 21 वर्षीय, रामकृष्ण नगरातील 56 वर्षीय आणि राजपूत लेन येथील 60 वर्षीय रुग्णांचे आज 11 वाजता आलेल्या अहवालात स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

विशेष म्हणजे आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये यापूर्वी काद्राबाद प्लॉट भागात यापूर्वी आढळून आलेल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा नातेवाईक आहे. याप्रमाणेच रामकृष्ण नगरात आढळून आलेला आजचा रुग्ण यापूर्वी कोरोनाबाधित झालेल्या एका डॉक्टरचा नातेवाईक आहे. याशिवाय तिसरा रुग्णदेखील यापूर्वी आढळून आलेल्या एका कोरोनाबाधिताचा नातेवाईक आहे. यामुळे आता या सर्वच कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नातेवाईक, मित्र परिवारातील लोकांचा शोध घेतल्या जात असून, त्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, रामकृष्ण नगर व काद्राबाद प्लॉट हा भाग यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून, या भागात आता संचारबंदी देखील लावण्यात आलेली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळून येत असल्याने रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि अधिकारी तसेच डॉक्टरांमध्ये देखील एक प्रकारची भीती निर्माण झाली. तर, जिल्हा रुग्णालयातच कोरोनाबाधित आढळून येत असल्याने नागरिकांमध्येदेखील चिंतेचे वातावरण आहे. तर, जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 674 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी 2 हजार 628 जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 115वर पोहोचली असून यातील चार जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर, 91 जण कोरोनामुक्त झाले असून 21 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details