परभणी - पेरणी ते फवारणी दरम्यान शेतकऱ्यांना प्रचंड परिश्रम करावे लागते. मात्र जिल्ह्याच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने 'फोर इन वन' असे यंत्र विकसित केले आहे ज्याच्या माध्यमातून पेरणी, रासणी, तननाशक आणि किटकनाशक फवारणी असे चारही कामे करता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनुष्यबळ वाचणार असून आर्थिक बचतही होणार आहे.
पेरणी ते फवारणी पर्यंतची कामे होणार एकाच यंत्रावर ; परभणीच्या 'वनामकृवि' ने विकसित केले यंत्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 'फोर इन वन' यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. मनुष्यबळ आणि आर्थिक बचत करणारे हे यंत्र कृषी विद्यापीठाच्या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी यांनी विकसित केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत निसर्गाचा लहरीपणा, शेतीचा खर्च व उत्पन्नाचा अंदाज नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 'फोर इन वन' यंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. मनुष्यबळ आणि आर्थिक बचत करणारे हे यंत्र कृषी विद्यापीठाच्या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी यांनी विकसित केले आहे. विशेष म्हणजे 12 मजुरांचे काम या एकाच यंत्राच्या सहाय्याने होते. तसेच या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्याला रासायनिक औषधांच्या फवारणीपासून होणारे प्रादुर्भाव देखील टाळता येतात.
विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरवर तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलांच्या सहाय्याने देखील वापरता येऊ शकते. याबाबत कृषी विद्यापीठाच्या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी यांनी 'ईटीव्ही भारत' ला सांगितले की, हे यंत्र गरीब शेतकऱ्यांना ही परवडेल. कारण त्याला कुठलेही इंधन लागत नाही. त्याचबरोबर यंत्र चालविण्यासाठी त्यावर सौर पॅनल बसविण्यात आला आहे. या सौर पॅनलचा उपयोग शेतकरी घरगुती विद्युत उपकरणे चालविण्यासाठी देखील करू शकतात. त्यामुळे हे यंत्र सध्या आठ बचत गटांना प्रायोगिक तत्वावर देण्यात आले आहे. शासनाच्या मंजुरीनंतर ते सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरेल, असेच म्हणावे लागेल.