परभणी- पदवीधरांच्या औरंगाबाद मतदारसंघासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अंतर्गत 1 ऑक्टोंबरपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार परभणी जिल्ह्यातील यापूर्वी नोंदणी केलेल्या तब्बल 31 हजार 624 मतदारांचे नाव रद्द करण्यात आले आहे. त्यांना देखील नव्याने नोंदणी करावी लागणार असून याशिवाय नवीन मतदारांना देखील नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा-मुंबईवर पुन्हा 26/11 सारखा हल्ल्याचा प्रयत्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा गौप्यस्फोट
या संदर्भात परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या संदर्भात 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी सूचना प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर नोंदणी सुरू होणार आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. तर 19 नोव्हेंबर पासून मतदार याद्यांची छपाई होणार आहे. तसेच 26 डिसेंबर रोजी पुरवणी यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिली.