परभणी - लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या 3 महिन्यात 100 रुग्णसंख्या असलेल्या परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता जुलै महिन्याच्या 20 दिवसात 400 च्या घरात गेली आहे. तसेच यादरम्यान 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित 198 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमीत कक्षात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री उशिरा देण्यात आलेल्या अहवालात नवीन 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या तीन आठवड्यांपासून झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यापासून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नव्हता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जून महिन्याच्या शेवटपर्यंत परभणी जिल्ह्यात 100 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच परभणी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत गेली. आजपर्यंत जिल्ह्यात तब्बल 392 एवढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये रविवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अहवालाप्रमाणे दिवसभरात 9 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली.