महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेत एकमत नसल्याने परभणीत जिल्हापरिषद अध्यक्षासह उपाध्यपदही राष्ट्रवादीकडे - परभणी जि.प.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असला तरी प्रत्यक्षात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची निवड झाली आहे. सेनेत उपाध्यक्ष पदासाठी एकमत झाले नसल्याने अध्यक्षपदी निर्मला विटेकर तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

विजयी उमेदवार
विजयी उमेदवार

By

Published : Jan 7, 2020, 3:18 PM IST

Updated : Jan 7, 2020, 3:28 PM IST

परभणी- येथील जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असला तरी प्रत्यक्षात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची निवड झाली आहे. शिवसेनेत उपाध्यक्ष पदावरून एकमत न झाल्याने ही दोन्ही पदे राष्ट्रवादीला गेली आहेत. त्यानुसार अध्यक्षपदी माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मला विटेकर तर उपाध्यक्ष म्हणून बोरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य अजय चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शिवसेनेत एकमत नसल्याने जिल्हापरिषद अध्यक्षासह उपाध्यपदही राष्ट्रवादीकडे


54 सदस्यीय परभणी जिल्हा परिषदेत 23 सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पुढील अडीच वर्षांसाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होणार हे निश्चित होते. परंतु, राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग परभणी जिल्हा परिषदेत देखील झाला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक पाथरी येथे घेतली. यावेळी दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड घेण्यासंदर्भात सर्वांचे एकमत घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या बदल्यात शिवसेनेने उपाध्यक्ष पदावर दावा केला होता. त्यानुसार त्यांना हे पद देण्यातही येणार होते.

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूर येथील माजी आमदार विजय भांबळे यांनी त्यांच्या गोटातील उमेदवारालाच उपाध्यक्ष पद द्यावे, अशी आग्रहाची मागणी लावून धरली. मात्र, त्यानंतर घडलेल्या घडामोडीत राष्ट्रवादीला अध्यक्ष आणि शिवसेनेला उपाध्यक्ष पद देण्याचे जवळपास निश्चित झाले. पण, शिवसेनेच्या 13 सदस्यांमध्ये उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्यावरून अखेरपर्यंत एकमत होऊ शकले नाही. परिणामी आज (दि. 7 जाने.) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादीच्याच सदस्यांचीच नावे पुढे आली.

हेही वाचा - परभणी-परळी दरम्यान धावणारी आदिलाबाद-अकोला रेल्वे २२ मार्चपर्यंत रद्द; ७७ दिवसांचा ब्लॉक

त्यानुसार दुपारी 1 वाजता अध्यक्षपदासाठी निर्मला विटेकर आणि उपाध्यक्ष पदासाठी अजय चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ज्यामुळे ही निवड निश्चित झाली. त्यामुळे स्टेशन रोडवरील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानापुढे फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या संदर्भात दुपारी 3 वाजता निर्वाचन अधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा झाली आहे.

हेही वाचा - सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय; कुडकुडत उघड्यावर झोपण्याची वेळ

Last Updated : Jan 7, 2020, 3:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details