महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी : पंचायती आखाड्याच्या 210 एकर जमीनीची परस्पर विक्री

परभणी तालुक्यातील मौजे दैठणा येथील पंचायती आखाडा महानिर्वानी या संस्थानच्या तब्बल 210 एकर (83 हेक्टर 49 आर) जमीनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या जमिनीचा फेरफार करू नये, तसेच संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज मंगळवारी (दि. 21 ) विविध राज्यातील आखाड्याच्या महंतांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Dec 21, 2021, 10:32 PM IST

परभणी- तालुक्यातील मौजे दैठणा येथील पंचायती आखाडा महानिर्वानी या संस्थानच्या तब्बल 210 एकर (83 हेक्टर 49 आर) जमीनीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या जमिनीचा फेरफार करू नये, तसेच संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज मंगळवारी (दि. 21 ) विविध राज्यातील आखाड्याच्या महंतांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

बोलताना महंत

जमीन विक्री करणाऱ्या महंताने दिला होता राजीनामा

मौजे दैठणा ( ता.परभणी ) येथील संस्थानच्या जमिनीची देखरेख करणारे श्री रामसेवकगिरी गुरू कपिल मुनी यांची रतननाथ संस्थान (जहागीर) (ता.रिसोड, जि.वाशीम) या संस्थानवर 1999 साली सचिव या पदावर विश्वस्थ मंडळाकडून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर संस्थानने ठराव घेत संस्थानची जमिन महंत कैलास भारतीगुरू कपिलमुनी व श्री रामसेवकगिरी या दोघा महंतांच्या नावे करण्यात आली होती. त्यानुसार त्या दोघांनी मिळून संस्थानच्या जमिनीचे तसेच सर्व आर्थीक व्यवहार आणि बँक खात्याचा कारभार पाहण्याचा अधिकार 2009 साली रजिस्टर मुखत्यारनामा ( अधिकारपत्र ) करुन श्रीमहंत रमेशगिरी गुरु कपिल मुनीयांच्याकडे सचिव म्हणून सोपविला. त्यानंतर श्री महंत रामसेवक गिरी गुरुकपिल मुनी यांची नियुक्ती हरीद्वारला करण्यात आली. त्यानंतर 2014 मध्ये त्यांची नियुक्ती प्रधान कार्यालय, दारागंज इलाहबाद (प्रयागराज) येथे कोठारी पदावर करण्यात आली होती. परंतु त्यानंतर 16 जुलै, 2021 रोजी त्यांनी त्यांच्या सचिव व कोठारी या दोन्ही पदाचा राजिनामा ( त्यागपत्र ) विश्वस्त मंडळाकडे दिले. विश्वस्त मंडळाने त्यांचा राजीनामा मंजूरही केला होता.

खरेदी-विक्री करणाऱ्यांसह साक्षीदारांवर गुन्हा दाखल करा

राजीनामा दिल्याननंतर श्री महंत रामसेवक गिरी गुरु कपिल मुनी यांचा संस्थानच्या मालमत्तेवर वैयक्तिक कुठलाही अधिकार राहीला नाही. मात्र, असे असतानाही त्यांनी संस्थानचे सचिव म्हणून मौजे दैठणा येथील 210 एकर (83 हेक्टर 49 आर) जमिन 15 व 16 डिसेंबर, 2021 रोजी बेकायदेशीर पद्धतीने विक्री केली, असा आरोप करण्यात आला आहे. ही जमीन गट क्र. 211/ 1, 211/ 2, 98 मधील असून, ती विक्री करणाऱ्यावर व खरेदी करणाऱ्यावर तसेच साक्षीदारांवर कायदेशीररीत्या कार्यवाही करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विविध राज्यातील महंतांची उपस्थिती

दरम्यान, या जमिनीचा गैरव्यवहार झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध मठांच्या महंतांसह गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या ठिकाणच्या महंतांनीही तक्रार देण्यासाठी उपस्थिती लावली होती. याशिवाय गावातील माजी सरपंच राजाराम कच्छवे यांच्यासह ग्रामस्थही मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

हे ही वाचा -Rajesh Tope On Omicron : 'ओमायक्रॉन' घातक नाही, मात्र संसर्गाचा वेग प्रचंड - राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details