परभणी - शहराजवळच्या खानापूर भागात पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पत्नीचा घरगुती वादातून पतीने वस्ताऱ्याने वार करून खून केला. त्यानंतर संतापाच्या भरात पतीने देखील स्वतःवर वार करत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी घडली. कमल जाधव-माने(वय २५) असे मृत पोलीस कर्मचारी महिलेचे नाव आहे. ती सध्या शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होती.
पती कृष्णा धोंडीबा माने (वय २९) हा शेतकरी होता. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी हे दाम्पत्य बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणाने वाद झाला. वाद होत असल्याचे पाहत कृष्णा माने याचा भाऊ आणि भाऊजय लहान मुलाला घेऊन शेजारच्या काकांकडे गेले. त्यांनंतर वाद विकोपाला गेल्याने कृष्णा माने याने पत्नीवर वस्ताऱ्याने वार केले. ज्यात कमल जाधव हिचा मृत्यू झाला. त्यानंतर कृष्णाने स्वत:च्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. कृष्णाला व्यसन होते, असे उपस्थितांनी सांगितले.