परभणी - शेळ्या चारण्याच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना जिंतूर तालुक्यातील सायखेडा या गावी काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास घडली. आरोपीला आज (बुधवारी) पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा झाला आहे.
परभणीच्या जिंतूर तालुक्यात शेळ्या चारण्याच्या वादातून सख्ख्या भावाचा खून - Parbhani news
परभणी जिल्ह्यात शेळ्या चारण्याच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपीला बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सायखेडा येथील जाधव कुटुंबातील रामराव जाधव व शेषराव जाधव या दोघा सख्ख्या भावात मंगळवारी शेतात शेळ्या चारू न देण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यातून दोघे एकमेकांच्या अंगावर धावले. रामराव (58) याने रागाच्या भरात भाऊ शेषराव (55) यांच्या डोक्यात कु-हाडीचे घाव घातले. त्यात शेषराव हे गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने जिंतूरला हालविले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. शेषराव यांना परभणीत नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे, चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार यांनी घटनास्थळास भेट दिली. तर आरोपी भावाला आज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मयताची पत्नी सावित्रा शेषराव जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामराव जाधव यांच्या विरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.