परभणी - वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्रात असलेल्या '70:30' च्या फॉर्मुल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्यामुळे हा फॉर्मुलाच रद्द करण्याच्या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्त्वात पालकमंत्री नवाब मलिक यांना मागण्यांचे फलक दाखवत आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात पालकमंत्री मलिक यांना निवेदन देऊन हा फार्म्युला रद्द करण्याची मागणी खासदार जाधव यांनी मलिक यांच्याकडे केली.
वैद्यकीय प्रवेशाचा70:30 फॉर्मुला रद्द करण्याची मागणी संजय जाधव यांनी केली वैद्यकीय प्रवेशाचा हा फॉर्म्युला रद्द न केल्यास संपूर्ण मराठवाड्यात व्यापक आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील संजय जाधव यांनी दिला. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर पालकमंत्री मलीक यांची खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार रत्नाकर गुट्टे, महापौर अनिता सोनकांबळे, बाजार समिती सदस्य व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, माजी उपमहापौर माजू लाला, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ.मारोती हुलसुरे, नगरसेवक अतुल सरोदे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत क्षीरसागर, पालक उद्धव देशमुख, राजकुमार भांबरे यांनी भेट घेतली.
'राष्ट्रीय पात्रता चाचणी (नीट)मध्ये पात्र झाल्यानंतर एमबीबीएसच्या प्रवेशासाठी मागील अनेक वर्षांपासून राज्यात विभागनिहाय 70:30 हे सूत्र राबवले जात आहे. राज्याचे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे तीन विभाग करून राज्यातील एमबीबीएसच्या एकूण जागांपैकी संपूर्ण देशाचा 15 टक्के वाटा वजा करून उर्वरित जागांसाठी 70 टक्के वाटा विभागाचा आणि 30 टक्के राज्याचा या सुत्रानुसार ही प्रवेश प्रक्रिया राबवल्या जाते. वास्तविक पाहता मराठवाडा विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या विभागात वैद्यकीय महाविद्यालय व एमबीबीएसच्या जागांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे. प्रचलित सुत्रामुळे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणार्या मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांवर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. विशेष म्हणजे 70:30 हे सूत्र देशातील कुठल्याही राज्यात राबवले जात नाही.
या सुत्रामुळे दरवर्षी मराठवाड्यातील 500 विद्यार्थी डॉक्टर बनण्यापासून वंचित राहत आहेत. ही बाब शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाडा विभागाच्या दृष्टीने हानिकारक व अन्यायकारक आहे. एमबीबीएसची प्रवेश प्रक्रिया ही सामाजिक तथा जातीनिहाय आरक्षणानुसार राबवली जात असताना पुन्हा विभागनिहाय आरक्षण कशासाठी? असा प्रश्न संपूर्ण मराठवाड्याला गेल्या अनेक वर्षांपासून सतावत आहे. 70:30 या सुत्रामुळे एमबीबीएसला प्रवेश मिळवण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना नीटमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत जवळपास 40 ते 50 गुण अधिक घ्यावे लागतात. ही बाब समानतेच्या तत्वाचा भंग करणारी आहे. त्यामुळे 70:30 हे सूत्र तातडीने रद्द करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी यावेळी पालकमंत्र्यांना करण्यात आली.