महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीच्या सहायक पोलीस अधीक्षकांची 'रझाकारी'; खासदार जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे तक्रार

सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या विरोधात खासदार जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे पोलीस महासंचालक आणि नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. बगाटे मनमानी कारभार करत असल्याचा जाधव यांचा आरोप आहे.

Nitin Bagate
सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

By

Published : May 21, 2020, 10:28 AM IST

परभणी -सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वर्दीचा गैरफायदा घेत आकसबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे. बगाटे यांनी परभणीत अक्षरशः रझाकारी चालवली असल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. बगाटे यांच्याकडून जाणीवपूर्वक शहरातील तरुणांवर गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप खासदार जाधव यांनी केला आहे. तर बगाटे यांनी यापूर्वी स्वतः खासदार संजय जाधव यांच्यावर 188 नुसार कारवाई केलेली आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

बगाटे यांनी सुरुवातीपासूनच खर्‍याचे खोटे करणे, खोट्या केसेस दाखल करणे, असा तुघलकी कारभार सुरू केला. त्यांच्या अशा मनमानी कारभाराचा आत्तापर्यंत अनेकांना फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी विसावा फाट्यावर काही कारण नसताना बगाटेंनी अरेरावीची भाषा वापरत हुज्जत घालून माझ्यावर कलम १८८ अंतर्गत कारवाई केली, असे जाधव म्हणाले.

तसेच लॉकडाऊन बाजारातील एका दुकानासमोर बसण्याच्या कारणावरून माजी आमदार बंडू पाचलिंग यांच्या मुलाला त्याची कुठलीही चूक नसताना मारहाण केली. १३ मे रोजी रवी जवंजाळ आणि ज्ञानेश्वर धस हे सरकारी लिलाव झालेल्या ठेक्यावरून अत्यावश्यक बांधकामासाठी आपल्या वाहनांमधून वाळू घेऊन जात होते. त्यांच्याकडे पावत्या असतानाही बगाटेंनी वाळूची वाहने अडवून पोलीस ठाण्यात नेली. त्यांच्यावर कलम ३७९ अंतर्गत वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाचे मत न घेताच त्यांना न्यायालयातही हजर केले. नंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मत घेतले, तेव्हा उपविभागीय अधिकार्‍यांनी सदर व्यक्तींनी वाळू चोरी केली नसल्याचे सांगितले. त्यानंतरही पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून गैरकारभाराचा कळस गाठला, असे जाधव यांनी सांगितले.

सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटें विरोधात खासदार जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे पोलीस महासंचालक आणि नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. याबाबत अद्याप नितीन बगाटे यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details