परभणी -वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने अक्षरश: कळस गाठला आहे. याचा फटका परभणी जिल्ह्यातील वीजग्राहकांना बसत आहे. विशेष म्हणजे ऐन सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने रहिवासी वैतागले आहे. त्यामुळे वीज महावितरण कंपनीच्या गैरकारभाराची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी वीज महावितरणच्या वरिष्ठांकडे केली आहे.
परभणीच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाने मनमानी कारभार चालविला आहे, असा आरोप देखील खासदार संजय जाधव यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीज महावितरणचे अधिक्षक अभियंता यांचे नियंत्रण राहिले नाही. परिणामी वारंवार वीज गायब होणे, वीज भारनियमनाच्या नावाखाली दिवसरात्र वीज पुरवठा खंडित होणे, वीज ग्राहकांना वेळेवर साहित्य न मिळणे, सणासुदीच्या काळात देखील वीज पुरवठा बंद राहणे, असे प्रकार सतत होत असल्याने वीज ग्राहक जाम वैतागले आहेत. नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. जनतेच्या आपल्याकडे तक्रारी आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून संबंधीत अधिकार्यांकडे विचारणा केल्यास चुकीची किंवा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. सामान्य माणसाला तर छोट्या-मोठ्या कामासाठी अनेक खेटे मारावे लागतात.