परभणी- येथून 20 किलोमीटरवर असलेल्या झिरो फाटा येथील मोक्याची सुमारे साडेतीन एकर जमीन परभणीचे खासदार संजय जाधव यांनी हडपल्याचा आरोप त्यांच्यावर संबंधित कुटुंबाने केला आहे. या आरोपाला उत्तर देण्यासाठी गुरुवारी (दि. 14 जाने.) खासदार संजय जाधव यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. आपण या व्यवहाराची नोंदणी केली असून, त्याचा मोबदला बँकेच्या माध्यमातून त्यांना पैसे दिले. मात्र, आरोप करणाऱ्यांनी त्या व्यक्तीलाच गायब केल्याचे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी हे खतपाणी घालत असल्याचा आरोप देखील खासदार जाधव यांनी केला.
यासंदर्भात परभणीच्या वसमत रोडवरील खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, युवा जिल्हाधिकारी अर्जुन सामाले, पप्पू गायकवाड आदी उपस्थित होते.
काय आहे हे प्रकरण
खासदार संजय जाधव यांच्यावर जमीन हडपल्याचा जो आरोप झाला आहे. ती जमीन परभणी-वसमत रोडवरील झिरो फाटा या ठिकाणी मोक्याच्या जागेवर आहे. तिची सध्या बाजार भावात कोट्यवधी रुपये किंमत आहे. ही जमीन खासदार संजय जाधव यांनी रामप्रसाद बाबाराव काळे यांच्याकडून खरेदी केली. सुमारे 3 एकर 35 गुंठे ही जमीन असून, ती खासदार संजय जाधव यांनी त्यांची पत्नी क्रांती जाधव यांच्या नावाने 27 ऑक्टोबर, 2020 रोजी खरेदीखत करून घेतले आहे. मात्र, जमिनीचे मूळ मालक रामप्रसाद काळे यांच्या पत्नी प्रेमा काळे, दोन मुली आणि सून वर्षा यांनी 'ही जमीन खासदार जाधव यांनी रामप्रसाद काळे यांना धमकावून किंवा त्यांना भूलथापा देऊन त्यांच्याकडून खरेदी केल्याचा आरोप केला आहे. या व्यवहाराला त्यांची सहमती नसल्याचे त्यांचे म्हणणे असून, त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून या महिला या जमिनीवर वास्तव्याला आहेत. त्यांनी खासदार संजय जाधव यांच्या विरोधात जिल्हाधिकारी तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जाऊन दाद मागणार असल्याचेही प्रेमा काळे यांनी म्हटले आहे. त्यानंतर हे प्रकरण जोरदार चर्चेत आले. त्यामुळे आज खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी आपला खुलासा माध्यमांपुढे मांडला आहे.
माझा व्यवहार पारदर्शी
हा व्यवहार आपण पारदर्शीपणे केला आहे. माझी पत्नी क्रांती जाधव यांच्या नावाने ही जमीन खरेदी केली असून, त्यांच्या बँके खात्यातून रामप्रसाद काळे यांच्या बँके खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. त्यामुळे यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. मात्र, ज्यांच्या नावाने पैसे दिले आहेत, त्यांना हे लोक पुढे येऊ देत नसल्याचे खासदार म्हणाले.