परभणी - येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या तीन दिवसांनंतर आज मंगळवारी (दि. 21 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन खासदार फौजिया खान यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खासदार फौजिया खान यांच्या निवासस्थानाकडे जाणार नांदखेडारोड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांमध्ये कोरोनाचा शिरकाव होत आहे. त्यात आता लोकप्रतिनिधिंना देखील कोरोनाची लागण होत आहे. गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती चांगली आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नुकत्याच राज्यसभेवर निवड झालेल्या खासदार फौजिया खान यांच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. विशेष म्हणजे त्या टाळेबंदीच्या संपूर्ण कालावधीत निवासस्थानीच थांबून आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी रॅपिड अँटिजेन तपासणी करून घेतली. ज्याचा अहवाल दुपारी प्राप्त झाला. यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्या निवासस्थानाचा परिसर असलेला नांदखेडा रोडचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तपासण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, परभणी शहरातील अन्य 4 संभाव्य रुग्णांचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ज्यामध्ये परभणी शहरातील इक्बाल नगरात 75 वर्षीय पुरुष, विद्या नगरात 68 वर्षीय पुरुष, दर्गा रोडवरील 60 वर्षीय पुरुष आणि टिपू सुलतान चौकातील 53 वर्षीय महिला, असे 4 नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 409 कोरोना रुग्ण आढळले असून उपचारादरम्यान 14 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 182 जण कोरोनामुक्त झाले असून 213 जणांवर उपचार सुरू आहेत.