परभणी- राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी आज (दि. 9 सप्टें.) आपल्याच पक्षाच्या परभणीतील पालकमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परभणी जिल्ह्यात 'कोरोना'ची परिस्थिती हाताळण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी परभणी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आणि त्यासंबंधी अवलंबण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याचे खासदार खान यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्यावरच अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्या म्हणाल्या, परभणीला स्थानिक पालकमंत्री मिळावा असता तर परभणीला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असते. आमची इच्छा आहे की, या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला मंत्रिमंडळात स्थान मिळायला पाहिजे. मात्र, या ठिकाणचा लोकप्रतिनिधी मंत्री होऊ नये आणि तो पालकमंत्री सुद्धा होता कामा नये, यासाठी या ठिकाणचे काही स्थानिक लोकप्रतिनिधी जास्त ताकत लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे हे पद दुसऱ्याला कोणाला जाऊ नये, त्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याचमुळे परभणी विकासापासून वंचित राहत आहे. म्हणून स्थानिक पालकमंत्री व मंत्रिमंडळात परभणीचा मंत्री नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नांदखेडा रोडवरील क्विन्स इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आज (बुधवारी) दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान बोलत होत्या.