परभणी -केंद्र शासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन धोरणांना मंजुरी दिली आहे. ते धोरण राज्य सरकार स्वीकारणार असून, येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय परभणीत सोमवारी होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत देखील हा ठराव पारित करून, शासनाला पाठविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज येथे दिली. ते 'परभणीकर संघर्ष समिती'च्या धरणे आंदोलनात बोलत होते.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात परभणीकर संघर्ष समितीच्या वतीने आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे महाविद्यालयाबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास परभणी बंदीची हाक दिली जाईल असा इशारा दिला आहे.
राज्य सरकार सकारात्मक
परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र मधल्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्यानंतर परभणीकरांचा गैरसमज झाला होता. हे महाविद्यालय परभणीच्या हक्काचे होते, असा त्यांचा समज होता. मात्र, तसे काही नाही येणाऱ्या काळात परभणीसह चंद्रपूर, नाशिक तसेच अन्य काही जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रश्न राज्यसरकार मार्गी लावणार आहे. या सर्व ठिकाणचे प्रस्ताव मंजूर होतील, असे देखील पालकमंत्री मलिक म्हणाले.
अन्यथा 28 फेब्रुवारीपासून परभणी बेमुदत बंद ठेवू - विजय गव्हाणे