महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीतील ८५ परप्रांतीय मजुरांना पोहचवले सीमेपर्यंत; कर्नाटक, तेलंगाणाच्या प्रवाशांना आज करणार रवाना - परप्रांतीयांचा परभणीवरून बसप्रवास

परभणीतून मध्यप्रदेशातील सुमारे ५०० कामगार सोमवारी पाठविण्यात आले. या कामगारांना धुळे जिल्ह्याच्या सीमेवर सोडण्यात आले आहे. आजदेखील दोन बसच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातील सुमारे ४० हुन अधिक मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच तेलंगाणा राज्यातील ९१ कामगारांना ४ बसमधून महाराष्ट्र-तेलंगाणाच्या सीमेवर सोडण्यात येणार आहे.

परभणीतील ८५ मजुर ४ बसमधून सीमेपर्यंत
परभणीतील ८५ मजुर ४ बसमधून सीमेपर्यंत

By

Published : May 13, 2020, 7:31 AM IST

परभणी - मोलमजुरी आणि किरकोळ व्यवसायासाठी परभणीत आलेल्या गुजरात आणि तामिळनाडू राज्यातील ८५ मजुरांना मंगळवारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसमधून राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यात आले आहे. यावेळी या मजुरांना दिवसभर पुरेल एवढे जेवण विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आले. दरम्यान, आज (बुधवार) तेलंगाणातील ९१ आणि कर्नाटक राज्यातील ४० हुन अधिक कामगारांना बुधवारी ६ बसमधून रवाना करण्यात येणार आहे.

परप्रांतीय मजुरांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली बस

परभणीसह जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये किरकोळ व्यवसाय आणि इतर मोलमजुरी करण्यासाठी देशातील अन्य राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मजूर लोक आलेले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे व्यवसाय, कारखाने आणि कंपन्या बंद पडल्या आहेत. परिणामी हे लोक बेरोजगार झाले असून, त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील अनेक परप्रांतीय सध्या परभणी शहराच्या सभोवताल जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारा गृहांमध्ये वास्तव्याला आहेत. या ठिकाणी त्यांना दोन वेळचे जेवण मिळत असले तरी प्रत्येकालाच आपल्या घरची ओढ लागली आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून वारंवार परतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले जात होते. या पार्श्वभूमीवर परभणीतून मध्यप्रदेशातील सुमारे ५०० कामगार सोमवारी पाठविण्यात आले. या कामगारांना धुळे जिल्ह्याच्या सीमेवर सोडण्यात आले आहे. तेथून पुढे मध्यप्रदेश सरकारच्या वतीने त्यांना त्यांच्या स्वजिल्ह्यात पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

बसमधील प्रवाशांना जेवणासह अन्य गरजोपयोगी वस्तूंचे वाटप

याप्रमाणेच तामिळनाडू राज्यातील २९ तर, गुजरात राज्यातील ५६ असे एकूण ८५ मजूर परभणी जिल्ह्यातील विविध भागात लॉकडाऊनमुळे अडकले होते. या मजूरांना मंगळवारी ४ बसमधून राज्याच्या सीमेपर्यंत मोफत प्रवासाची सोय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशाने करण्यात आली. यावेळी या मजुरांना दिवसभर पुरेल एवढे जेवण पोलीस प्रशासन व विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आले. तसेच यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. शिवाय ही बस घेऊन जाणाऱ्या चालक व वाहकाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आजदेखील (बुधवार) दोन बसच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातील सुमारे ४० हुन अधिक मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच तेलंगाणा राज्यातील ९१ कामगारांना ४ बसमधून महाराष्ट्र-तेलंगाणाच्या सीमेवर सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details