परभणी - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्ल्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत आणि तेथून पुढे भोपाळ येथे हायसिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबला पाठवावे लागतात. मात्र, या ठिकाणाहून येणाऱ्या अहवालाची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या तपासण्या होण्यासाठी परभणीत हायसिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबची उभारणी करावी, अशी मागणी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात पसरणाऱ्या बर्डफ्लू या संसर्गाच्या प्रभावी उपाययोजनेसाठी प्रादेशिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसोबत आमदार डॉ.राहुल पाटील यांची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आमदार पाटील यांनी परभणी येथे तात्काळ हायसिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबच्या उभारणीस मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
'संबंधित अधिकाऱ्यांची बैठक -
परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाने डोके वर काढले आहे. त्यामुळे हजारो कोंबड्या व इतर पक्षी मृत्यूमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभुमीवर संबंधित रोगाच्या प्रादुर्भावाचा प्रतिबंध करण्यासाठी परभणी येथे हायसिक्युरिटी अॅनिमल डिसीजलॅब उभारणीची गरज आहे. या बाबत आज (मंगळवार) प्रादेशिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक आमदार संपर्क कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीस औरंगाबाद येथील प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.संजय गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अशोक लोणे, जिल्हा पशुसंवर्धन सहआयुक्त शिवाजी पवार, पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रकाश सावने, सहपशुधन अधिकारी आर.बी. शितळे, मनपा सदस्य सुशील कांबळे आदि उपस्थित होते.