परभणी - जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा कोरोना अहवाल आज(रविवारी) पॉझिटिव्ह आला आहे. त्या नुकत्याच मुंबईत मतदारसंघातील शेतीविषयक प्रश्नांसाठी मंत्र्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर पुण्यात त्यांनी तपासणी करून घेतली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. शिवाय त्यांचा हा संसर्ग आयपीएस असलेल्या पतीसह घरातील इतर सात सदस्यांपर्यंत पोहोचला असून, या सर्वांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
परभणी जिल्ह्यात यापूर्वी पाथरी येथील विधान परिषदेचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. शिवाय त्यांचा संसर्ग त्यांच्या घरातील इतर काही सदस्यांपर्यंत पोहोचला होता. याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या खासदार फौजिया खान यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा संसर्ग पतीसह घरातील इतर काही सदस्यांनाही झाला होता. मात्र, हे दोन्ही लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या घरातील सदस्य आता ठणठणीत बरे होऊन नियमित कामांमध्ये गुंतले आहेत.
आज (रविवारी) सकाळी जिंतूर मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची खबर परभणी येवून धडकली. मेघना बोर्डीकर या भाजपच्या सक्रिय आमदारांपैकी एक आहेत. कोरोनाच्या परिस्थितीत देखील त्या मतदारसंघात नियमित भेटी देत होत्या. तसेच दोन दिवसांपूर्वी मतदारसंघातील शेतीविषयक प्रश्नांसाठी त्या कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत गेल्या होत्या. त्यानंतर त्या पुण्यात त्यांचे पती आयपीएस अधिकारी दीपक साकोरे यांच्या घरी परतल्या; मात्र त्यानंतर त्यांनी काही लक्षणे आढळून आल्याने कोरोनाची तपासणी करून घेतली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला.