परभणी -परभणी ते परळी रेल्वे प्रवासादरम्यान पोखर्णी स्थानकावर रुळाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे या दरम्यान धावणारी आदिलाबाद-परळी आणि अकोला-परळी या दोन्ही सवारी (पॅसेंजर) गाड्या २२ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या आता परभणीपर्यंत धावतील, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
परभणी ते परळी सेक्शन मधील गंगाखेड ते पोखर्णी (नृसिंह) रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्ती करीता सकाळी ९:४५ ते दुपारी १३:४५ दरम्यान रोज ४ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान ७७ दिवसांचा असेल. यामुळे याचा २ गाड्यांवर परिणाम होईल. यामध्ये (गाडी संख्या ५७५५४) आदिलाबाद ते परळी ही सवारी गाडी परभणीपर्यंतच धावेल. म्हणजेच ही गाडी परभणी ते परळी दरम्यान ६ जानेवारी ते २२ मार्च दरम्यान रद्द असेल.