महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलेच्या मृत्यूस जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार ! परभणीत नातेवाईकांचे उपोषण

काजल नितीन धापसे (रा. आंबेडकर नगर, सेलू) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला २४ एप्रिल रोजी प्रसूती करिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परभणीत नातेवाईकांचे उपोषण सुरू आहे.

By

Published : May 14, 2019, 11:46 PM IST

परभणी -जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिला आहे.

महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे

काजल नितीन धापसे (रा. आंबेडकर नगर, सेलू) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला २४ एप्रिल रोजी प्रसूती करिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादिवशी शस्त्रक्रिया (सिझेरियन) करून तिची प्रसूती करण्यात आली. यावेळी डॉक्टरांनी महिला व तिचा मुलगा दोघेही चांगले असल्याचे सांगितले. परंतु त्याच दिवशी रात्री ९ वाजता महिलेला ताप आल्याने नर्सने डॉक्टरांना फोन लावून हा प्रकार सांगितला. यावेळी डॉक्टरांनी इंजेक्शन देण्यास सांगितले. परंतु नर्सने या महिलेला दोन इंजेक्शन दिले. त्यानंतर तिचे अंग थंडगार पडले आणि यात रात्री दीड ते दोनच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे महिलेच्या आईने आरडाओरड केल्यावर नर्सने ऑक्सिजन लावून पंपींग केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

ही घटना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाली असून यासाठी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी महिलेचे वडील माणिक गजाननराव झोडपे (रा. शालीमार नगर, परभणी) यांनी २ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मागणी केली होती. परंतु त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने झोडपे यांच्यासह महिलेच्या इतर नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देखील त्यांच्याकडे कुठलाही जबाबदार अधिकारी फिरकला नाही, त्यामुळे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details