परभणी -जिल्ह्यात महिन्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून परभणीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. काल बुधवारी यामध्ये आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली असली तरी आज (गुरुवारी) सायंकाळी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी नव्याने आदेश बजावून उद्या शुक्रवार (2 एप्रिल) पासून सकाळी 7 ते दुपारी 2 या काळात जिल्ह्यातील बाजार पेठ सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विविध उपाययोजना राबवत जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, यास व्यापारी आणि विविध संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. त्यातच जिंतूर येथील एका व्यापाऱ्याने आज लॉकडाऊनला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होणारा विरोध प्रशासनाच्या लक्षात आला. शिवाय पालकमंत्री नवाब मलिक देखील या लॉकडाऊनच्या विरोधात आहे. विरोधात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्याचे दिसून येते.
हेही वाचा -अँटिलिया स्फोटके प्रकरणी एनआयएने आतापर्यंत जप्त केल्या आठ गाड्या
व्यापाऱ्यांचा कडकडीत विरोध -
दरम्यान, मागच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच परभणी जिल्हा व्यापारी महासंघ आणि काही कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी मुगळीकर यांना निवेदन देऊन विरोधात आंदोलन देखील केले होते. त्यानंतर सेलू येथील सुमारे पावणे तीनशे व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांचा अहवाल तब्बल दहा दिवसांनंतर प्राप्त झाला. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध सेलूतील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून विरोध दर्शवला. शिवाय जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी देखील विरोध केला. अनेकांनी पालकमंत्री नवाब मलिक यांना थेट दूरध्वनीवरून विरोध दर्शवला. मात्र असे असले तरी रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आपण हे पाऊल उचलत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. परंतु आता 8 दिवसांच्या संचारबंदीमुळे परभणीतील रहिवाशांची कामे खोळंबली आहेत. अनेकांना संसारोपयोगी साहित्य खरेदीची आवश्यकता असून, या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारपासून सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत बाजारपेठा उघड्या राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी बजावले आहेत.
गुरुवारी कोरोनाचे 11 बळी; 400 रुग्णांची भर
जिल्ह्यात आज (गुरूवारी) 400 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर उपचारादरम्यान 11 बाधितांचा मृत्यू झाला असून, यात 6 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 2 हजार 535 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 423 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 14 हजार 857 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले आहेत. त्यापैकी 11 हजार 899 व्यक्ती करोनामुक्त झाले. विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 73 हजार 223 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले असून त्यात 1 लाख 57 हजार 785 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह तर 14 हजार 857 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आहेत. या शिवाय 594 अनिर्णायक तर 140 नमुने नाकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा -राज्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने राज्याला फटका -डॉ. संजय ओक