परभणी - शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. जिंतूर बाजार समितीवर नेमण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशासकीय मंडळाच्या विरोधात थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिंतूरसह मानवतच्या देखील बाजार समितीत नेमण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाला स्थगिती दिली आहे.
परभणी जिल्ह्यात 'शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी' असा वाद निर्माण झाला आहे. मात्र, शिवसेनेचा 30 वर्षांपासून बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यात सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीचा पालकमंत्री नेमण्यात आला. तेव्हापासूनच या दोन पक्षांमधील वादाला सुरुवात झाली होती. याचे पडसाद खासदार संजय जाधव यांनी चार दिवसांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याच्या माध्यमातून उलटल्याचे दिसून आले. खासदार जाधव यांनी आपल्या राजीनामा पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्याय मिळत नसल्याचे म्हटले होते. त्यांनी वारंवार मागणी करून सुद्धा जिंतूर बाजार समितीवर दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासक नेमण्यात आला. ज्यामुळे खासदारांनी नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.
खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्यानंतर 'त्या' बाजार समित्यांच्या प्रशासकाला स्थगिती
परभणी जिल्ह्यात 'शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी' असा वाद निर्माण झाला आहे. मात्र, शिवसेनेचा 30 वर्षांपासून बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यात सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीचा पालकमंत्री नेमण्यात आला. तेव्हापासूनच या दोन पक्षांमधील वादाला सुरुवात झाली होती.
यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर बुुधवारी सायंकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार जाधव यांना मुंबईत पाचारण करून यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये खासदार जाधव यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा त्यांनी सकारात्मक दृष्टीने विचार करू, असे सांगितल्याची माहिती खासदार जाधव यांच्या वतीने देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात एका निवेदनावर टिपणी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः जिंतूरसह मानवतच्या बाजार समितीत नेमण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाला स्थगिती देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासक जिंतूरात नेमण्यात आला, त्याच्यावरील स्थगिती हे समजण्यासारखे आहे. मात्र मानवत बाजार समितीत शिवसेनेचाच प्रशासक असताना त्यावर स्थगिती दिली, याबाबत आता जोरदार चर्चा झडत आहे. दरम्यान, मानवतच्या बाजार समितीत नेमण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाला विरोधात 'राष्ट्रवादी'ची तक्रार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांनी मानवतच्या संदर्भात देखील स्थगितीचा निर्णय घेतल्याचे समजते.