परभणी - देश स्वतंत्र झाल्याच्या 74 वर्षांनंतरही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्ते उपलब्ध नसल्याची शोकांतिका आहे. जिंतूर तालुक्यातील पिंपराळा या गावातदेखील हीच परिस्थिती असून, एका वयोवृद्ध आजीला चक्क पाठीवर बसून 3 किलोमीटर पायपीट करत नातवाला रुग्णालय गाठावे लागले. धो-धो पाऊस बरसत असल्याने रस्त्यावर चिखल झाला होता. परिणामी वाहन जात नसल्याने या नातवाला घरच्या दोन महिलांसह आजीला अशा पद्धतीने रुग्णालयात न्यावे लागले. ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील आदिवासी लोकवस्ती असलेल्या जिंतूर तालुक्यातील पिंपराळा गावातील कौसाबाई चाफे (वय 85) या आजीला अचानक जुलाब आणि उलट्या व्हायला लागल्या. घरगुती उपचार करूनही त्रास थांबत नसल्याने या आजीला राजकुमार (वय 18) नावाच्या नातवाने रुमालाने पाठीवर बांधून पुढील उपचारासाठी जिंतूरला आणले. 74 वर्षपासून या गावातील नागरिकांच्या वाट्याला अशीच दैना आहे. कारण या गावाने अजूनही पक्का रस्ता पाहिलेला नाही. रस्ता नसल्यामुळे कित्येक महिला वाटेतल्या माळरानाजवळ बाळंत झाल्या आहेत. अनेक मुला-मुलींनी शिक्षण अर्धवट सोडले, सर्प, विंचूदंश, विषबाधा अर्धांगवायू, हृदयविकार अशा अवस्थेचे रुग्ण कायम 'अधू' झाले आहेत.