महाराष्ट्र

maharashtra

विरोधकांचा सत्तेचा माज जनतेने उतरवला - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणीकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे.

By

Published : Aug 29, 2019, 6:07 PM IST

Published : Aug 29, 2019, 6:07 PM IST

देवेंद्र फडणवीस

परभणी - राष्ट्रवादीच्या सभेला मंगल कार्यालय देखील भरत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. तर आम्हाला मैदाने सुद्धा पुरत नाही, अशी परिस्थिती आहे. जनतेने त्यांना पंधरा वर्षे सत्ता दिली होती. मात्र, या सत्तेची त्यांना माजुरी आणि मुजोरी एवढी आली होती की, त्यांची सामान्य माणसाशी नाळ तुटली. म्हणून जनतेनेच त्यांना पटकले. आधी 2014 ला आणि आता 2019 मध्ये सुद्धा भाजपला सत्ता देऊन जनतेने लोकसभेत विरोधकांना विरोधी पक्षनेता करण्याची संधी देखील दिली नाही, अशी जोरदार टीका आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्ह्यातील सेलू येथे केली.

भाजपची 'महाजनादेश यात्रा' परभणी
भाजपची 'महाजनादेश यात्रा' आज (गुरुवारी) परभणी जिल्ह्यात पोहोचली. दुपारी तीन वाजता सेलू येथे दाखल झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत जनतेशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विठ्ठलराव रबदडे, संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हरल्यानंतरही विरोधक सुधारले नाहीत. विरोधक म्हणतात, आम्हाला जनतेने नाही तर ईव्हीएम मशिनने हरवले आहे. अरे मशीन हरवत नसते, तुम्हाला जनतेनेच हरवले आहे. जनतेच्या मनात मोदी आहेत, म्हणून प्रत्येक माणूस मतदानाच्या वेळी कमळाचे बटन दाबतो आहे.

तत्पूर्वी, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले, मुख्यमंत्री मराठवाड्यासाठी राजा भगीरथ बनून आले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात होणाऱ्या वॉटर ग्रिट प्रकल्पामुळे हा भाग सुजलाम-सुफलाम होणार आहे. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे तब्बल 167 टीएमसी पाणी ते मराठवाड्यात वळवणार आहेत. यामुळे या भागातील दुष्काळ कायमचा संपणार आहे. दरम्यान, या सभेला जिंतूरसह सेलू तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details