परभणी -लोकसभा मतदारसंघात एकूण ६४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्यापैकी परभणी जिल्ह्यात येणाऱ्या ५१ संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच या भागात विशेष पथक गस्त घालणार आहे. या प्रमाणेच ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या कृषी विद्यापीठातील स्ट्राँग रुमला देखील एसआरपी आणि सीआरपीएफ जवानांचे कडक सुरक्षा कवच राहणार असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे.
उद्या (गुरुवारी) परभणी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा क्षेत्रात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांसोबत राखीव दल आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त असेल. शिवाय जिल्ह्यातील ५१ संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा बल तैनात करण्यात येणार असून या केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक दिवसभर गस्त घालणार आहे. दरम्यान, परभणी पोलीस दलाच्यावतीने परभणी शहरासह सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पथसंचलन करून सुरक्षेची खात्री सामान्य नागरिकांना दिली आहे.