महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत शुक्रवार सायंकाळपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी - Parbhani curfew

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 800 हून अधिक झाली आहे. एकट्या जुलै महिन्यात आकडा तब्बल सात पटीने वाढला आहे.

परभणी कोरोना अपडेट
परभणी कोरोना अपडेट

By

Published : Aug 7, 2020, 5:23 PM IST

परभणी - जिल्ह्यात मोठ्या संख्येने आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दुपारी आदेश काढले आहेत. दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून दर शनिवारी व रविवारी जिल्ह्याच्या नागरी भागात ही संचारबंदी लागू करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 800 हून अधिक झाली आहे. एकट्या जुलै महिन्यात आकडा तब्बल सात पटीने वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी लावण्यात येत आहे. शिवाय परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना देखील रोखण्यासाठी ई-पासवर बंदी आणण्यात आली आहे. त्या संदर्भातल्या सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी महाराष्ट्रातील अन्य जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नाही. या प्रमाणे जिल्ह्यांतर्गत उपाययोजना म्हणून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी संचारबंदी लावण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी आदेश काढण्यात आला आहे.

या अंतर्गत परभणी शहराच्या 5 किलोमीटर परिसरात तर जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत 3 किलोमीटर परिसरात संचारबंदीची अंमलबजावणी होणार आहे; मात्र या संचारबंदीतून सर्व शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी व वाहने, सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व सेवेशी निगडीत कर्मचारी, आस्थापना, वाहने, शासकीय निवारागृहात अन्नवाटप करणारे एनजीओ, पेट्रोल पंप, गॅस वितरक त्यांचे कर्मचारी व त्यांची वाहने, दूध विक्रेते, सर्व प्रकारच्या बँका केवळ रास्त भाव दुकानदारांसाठी व पेट्रोल पंप, गॅस वितरक, वीज वितरण कंपनी आदींचे चलन भरून घेण्यासाठी उघड्या राहणार आहेत. तसेच खाते, बी-बियाणे आदींचे गोदामे, दुकाने, महा ई-सेवा केंद्र व सीएससी सेंटरला केवळ पीक विम्यासंबधित कामासाठी रात्री दहापर्यंत सूट देण्यात आली आहे.

याप्रमाणेच केश कर्तनालयांना सकाळी 7 ते 11 या वेळेत सूट राहणार आहे. याव्यतिरिक्त कुठल्याही आस्थापनांनी आपली दुकाने उघडू नयेत. शिवाय रस्त्यावर कुठल्याही नागरिकांनी विनाकारण फिरू नये, असे आवाहन करतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने आढळणाऱ्या व्यक्तींवर तसेच वाहनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आणि संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details