परभणी - जिल्ह्यातील पूर्णा शहरात एका बंगाली महिलेने तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने चिमुकलीला उचलून काही अंतर दूर नेताच लोकांना तिचा संशय आला. त्यामुळे तिला पकडून बेदम चोप दिला आहे. शिवाय महिलेला पूर्ण पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्ह्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिमुकलीला पळवणार्या महिलेला पकडून बेदम चोपले; पूर्णेतील घटना - पूर्णा पोलीस स्टेशन
पूर्णा शहरात एका बंगाली महिलेने तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने चिमुकलीला उचलून काही अंतर दूर नेताच लोकांना तिचा संशय आला. त्यामुळे तिला पकडून बेदम चोप दिला आहे.
सदर घटना पूर्णा शहरातील व्यंकटी प्लॉट परिसरात घडली आहे. याठिकाणी संजय सुरेशलाल चावरिया यांची तीन वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती. याचवेळी बंगाली असलेल्या सुमित्रा (गांधरी) चंपा बावरी (रा. पुरलिया ठाणा उचीपाडा साहेब बांध पश्चिम बंगाल) या महिलेने चिमुकलीला उचलून तेथून पळ काढला. मात्र, थोड्या अंतरावर गेल्यावर सदर चिमुकलीने आरडाओरड केली. तेव्हा लोकांचे लक्ष गेले. सदर महिलेवर संशय आल्याने लोकांनी तिला अडवले. त्यानंतर चिमुकलीला तिच्या ताब्यातून घेऊन महिलेला चांगलाच चोप दिला. त्यानंतर याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ करत आहेत. अशा प्रकारची घटना घडल्याने पूर्णा शहरात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.