परभणी - लॉकडाऊन असूनही राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पुढे येण्याची गरज असून, कोविड सेंटर उभारण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवत बाजार समितीने राज्यातील पहिले कोविड सेंटर उभारले आहे. मानवत पाठोपाठ जिंतूर, सेलू आणि आज पाथरी येथे देखील कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे 50 बेडचे सर्व सोई-सुविधांसह सुसज्ज आणि मोफत उपचार सुविधा देणाऱ्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन कृषीमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने व पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या हस्ते प्रत्यक्षरीत्या झाले.
'राज्यभर परभणी पॅटर्न राबवणार'
बाजार समितीचे राज्यातील पहिले 4 कोविड सेंटर परभणी जिल्ह्याने उभारल्याबद्दल जिल्ह्याचे कौतुक करत राज्यभर परभणी पॅटर्न राबविण्यात येईल, असे गौरवोद्गार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले आहेत. तसेच यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आमदार बाबजानी दुराणी आणि माजी आमदार विजय भांबळे यांचे अभिनंदन केले.