महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मोदी सरकारचा 'एनआरसी आणि सीएए'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे घडवण्याचा कट" - kanhaiyya kumar parbhani speech

सरकारला जीवनावश्यक समस्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, सरकारी नोकऱ्या याबाबत सवाल करायला हवा, आवाहन कन्हैय्या कुमार परभणी येथे केले.

kanhaiyya kumar on CAA at Parbhani
कन्हैय्या कुमार

By

Published : Jan 28, 2020, 10:48 PM IST

परभणी -नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हा मुद्दा यासाठी आणला आहे, की पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम फाळणी करत देशातील मुलभूत प्रश्नांना बगल देता येईल. तसेच दोन समाजामध्ये दंगे घडवून आणण्याचा कट मोदी सरकार रचत आहे. याद्वारे देशाच्या संविधानाला हात घालण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांनी केला आहे. जिल्ह्यातील पाथरीच्या जिल्हा परिषद मैदानावर मंगळवारी सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ सभा झाली यावेळी ते बोलत होते.

"मोदी सरकारचा 'एनआरसी आणि सीएए'च्या माध्यमातून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे घडवण्याचा कट"

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध या सभेचे आयोजन केले होते. पुढे कन्हैय्याकुमार म्हणाले, अर्थव्यवस्था ढासळत असताना देशातील जनतेला भ्रमित करण्यासाठी केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए लागू केला आहे. याविरोधात सर्वांनी जात, धर्म विसरून एकत्र यावे. एनआरसी व एनपीआर एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एप्रिल महिन्यापासून याची भारतभर सुरुवात होणार आहे. यावेळी कर्मचारी सर्वांच्या घरी येत माहिती घेणार आहेत. त्यानंतर कार्यालयात बसून संदिग्ध नागरिकांची यादी तयार करतील. यासाठी तुमचे वडील कुठे जन्मले? तुमची भाषा काय? याचा आधार घेतला जाईल.

"प्रधानमंत्री म्हणाले होते, आम्ही कपड्यावरुन आंदोलक कोण आहेत, हे ओळखतो. पण त्यांना हे माहीत नाही की, तुमच्या भाषेवरुन आम्ही तुम्हाला ओळखतो. तुम्ही इंग्रजांची भाषा बोलत आहात, हे स्पष्ट आहे. तुम्ही जनरल डायरची भाषा बोलत आहात, त्याने जालियानवाला बागमध्ये शेकडो भारतीयांचे प्राण घेतले. तुम्ही त्याच ईर्षेने दिल्लीतील शाहीन बागच्या नागरिकांना करंट देण्याचा विचार करत आहात." असा आरोप कन्हैय्या यांनी यावेळी केला.

सरकारला जीवनावश्यक समस्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, सरकारी नोकऱ्या याबाबत सवाल करायला हवा, असेही आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले. यावेळी आमदार बाबाजनी दुर्राणी यांनी मुस्लिम समुदायाने या कायद्यांविरोधातील आंदोलने गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावर राहूनच करावीत, असे आवाहन केले. या सभेच्या व्यासपीठावर मुजाहेद खान, राजन क्षीरसागर, राजेश विटेकर, मुंजाजी भाले, सारंगधर महाराज, अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, नगराध्यक्ष मीना भोरे, पं.स. सभापती कल्पना थोरात, उपनगराध्यक्ष हनान दुर्राणी, नगरसेवक हसीब खान, कलीम अन्सारी, राजीव पामे उपस्थित होते.

हेही वाचा - 'हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे'

ABOUT THE AUTHOR

...view details