परभणी - भाजप सरकारने नोटाबंदी केली, त्यानंतरही देशाची अर्थव्यवस्था सुधारली नाही. या सरकारला रिझर्व्ह बँकेच्या राखीव पैशालादेखील हात घालावा लागला, हे सरकार कफल्लक झाले आहे. गेल्या ६० वर्षात देशावर ५१ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यात मोदी सरकारने केवळ ५ वर्षात ३१ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा वाढवून देशावर ८२ लाख कोटी रुपयांचे कर्ज केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
मोदींनी पाच वर्षात देशावर ३१ लाख कोटी रुपयांचे कर्ज केले - जयंत पाटील
गेल्या ६० वर्षात देशावर ५१ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यात मोदी सरकारने केवळ ५ वर्षात ३१ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा वाढवून देशावर ८२ लाख कोटी रुपयांचे कर्ज केले.
परभणी लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी जिल्हा दौर्यावर आलेले जयंत पाटील यांनी परभणीतील वैष्णवी मंगल कार्यालयात व्यापाऱ्यांची बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, जीएसटीची व्यवस्था चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांना संकट वाटत आहे. याचा पुनर्विचार व्हायलाच पाहिजे. आमचे सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करू. ग्राहक, व्यापारी यांच्या सोयीची जीएसटी आणण्यासाठी या कर प्रणालीत सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी व्यापाऱ्यांना दिले.
दरम्यान, व्यापारी आणि उद्योजकांच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी विधान परिषदेत व्यापारी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारा सदस्य असावा, अशी मागणी व्यापार्यांनी केली. त्यावर जयंत पाटील यांनी याबाबत नक्कीच विचार करण्यात येईल, व्यापारी मतदार संघ निर्माण करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू, असे सांगितले. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या २८ ते ३० जागा निवडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आता मोदी सरकारकडे मुद्दे नसल्याने ते गुद्यावर उतरले आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे शरद पवारांना दम दे, अन्य नेत्यांना दम देण्याचा प्रकार मोदी करत आहेत. गेल्या ६० वर्षात एवढे पंतप्रधान पाहिले; परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारा पहिलेच पंतप्रधान मोदी असल्याचे जयंत पाटील म्हणाले. तत्पूर्वी, उमेदवार राजेश विटेकर, सुरेश वरपूडकर, सुरेश देशमुख, प्रताप देशमुख, सचिन अंबिलवादे आदींसह पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. या बैठकीला परभणी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.