परभणी - शहरातील हरियाणा जिलेबी सेंटरचे मालक सनी सिंग गेल्या नऊ वर्षांपासून नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या कन्यारत्नाच्या पालकांना 2 किलो मोफत जिलेबी देऊन तिचे स्वागत करत आहेत. आज (1 जानेवारी) त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मलेल्या एका भाग्यवान मुलीला चक्क सोन्याचे नाणे दिले आहे.
हरियाणा येथून स्थलांतरीत झालेले सनी सिंग आणि त्यांचे वडील गेल्या 42 वर्षांपासून परभणीकरांना गरमागरम जिलेबीचा आस्वाद देत आहेत. शहरातील बस स्थानक परिसरात त्यांचे दुकान आहे. आज दिवसभरात सनी यांनी 23 पालकांना प्रत्येकी दोन किलो जलेबी दिली. आपल्या वडिलांकडून हा उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाल्याचे सनी सांगतात. यातून अनेक लोकांचे आशिर्वाद मिळत असल्याची भावनाही ते व्यक्त करतात.