परभणी - दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीबाणीतून मुक्ती मिळविण्यासाठी गंगाखेड तालुक्यातील ईसादचे आबाल-वृद्ध सरसावले आहेत. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग नोंदवला आहे. मागील १० दिवसांपासून गावातील सर्वच मंडळी आपसातील मतभेद विसरून विविध कामे पूर्ण करण्यासाठी झटत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सध्या संपूर्ण गंगाखेड तालुक्यात श्रमदानाचे तुफान आल्याचे चित्र आहे. सिनेअभिनेते अमिर खान यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावागावात विविध कामे पूर्ण केली जात आहेत. गंगाखेडपासून जवळच असलेल्या ईसाद येथेही गेल्या १० दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ श्रमदान केले जात आहे. सर्वच राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, व्यापारी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. श्रमदानातून अद्याप बांध-बंदिस्ती, सीसीटीची कामे करण्यात आली आहेत. तर आगामी काळात ईसाद डॅमसह इतर नद्या-नाल्यांचे रूंदीकरण आणि गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सिद्धार्थ भालेराव यांनी दिली.